मन, बुध्दी व शरीर यांबाबत थोडेसे अधिक बोलू

आपण यापूर्वीची पोस्ट वाचलीच आहे. आपली मूळ समस्या मन, बुध्दी व शरीर आणि ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन शक्ती यांचा काही संबंध आहे का व असल्यास तो कोणता आहे हीच आहे ! इथे आपण थोडा वेगळा विचार करणार आहोत. धर्म व देवता यांच्या पलिकडे जाऊन हया मूळ समस्येचा अधिक विचार करणार आहोत. म्हणजेच, हे कर्तेकरविते शरीर, मन व बुध्दी हे स्वत:च आहेत का ? हा स्वतंत्र विचार आपण इथे विचारात घेणार आहोत.‌

शरीर मनाचे ऐकते की मन शरीराचे ? 

दुसऱ्या शब्दांत बोलायचे झाल्यास , शरीराची ईच्छा मन मानते की मनाची ईच्छा शरीर मानते ? थेट बोलतो.‌ शरीराचा मनावर परिणाम होतो की मनाचा शरीरावर ? असे दिसते की हे दोन्ही एकमेकांत गुंतलेले पदार्थ आहेत. म्हणजे गुंतागुंत आहे ! ही समस्याच असल्याने ती गुंतागुंतीची असणारच. किंबहुना, ही समस्याच जीवनातील सर्व समस्यांचे निर्मितीकेंद्र असल्याने ती अधिकच गुंतागुंतीची असणार हे उघडच आहे. अर्थात, बहुतेकजण हे इतक्यात मान्य करणार नाहीत. पण आपण मागील लेखातही वाचले आहेच की , आपले शरीर ,मन व बुध्दी यांच्या व्यवहारातून जीवनात अनेक घटना घडतात. त्यात अनेक समस्याही असतात.‌ मनाच्या ईच्छा आकांक्षा किंवा शरीराच्या ईच्छा आकांक्षा आणि काय करावे याचा निर्णय घेण्याचा विचार करणारी बुध्दी या तिघांची रस्सीखेच व घालमेल यातूनही पुन्हा काही समस्याचक्र निर्माण होऊ शकते. यामुळेच कधी कधी भोग संपतच नाहीत, संकटे सरतच नाहीत, शनीची पीडा संपतच नाही अशी माणसाची भावना होते. हे काय होऊन बसते आयुष्यात ? शरीर ,मन व बुध्दी इतका गोंधळ घालतात आयुष्यात ? होय, हे खरे आहे ! हे तिघेच हा गोंधळ घालतात. पण माणूस याबाबतीत स्वतःकडे बोट न दाखवता देव , दैव‌, शनी इ. कडे बोट दाखवणे अधिक पसंत करतो. समस्याचक्रात माणूस इतका अडकत जातो आणि त्यापुढे तो इतका हताश होतो की, त्याला बहुतेक दुसरे काही सूचतही नसावे.‌ तो इतका सैरभर होतो की मिळेल तिथे धावत सुटतो. मिळेल तो आधार पकडायला बघतो.‌  बुडत्याला काडीचा आधार ही म्हण याच अनुभवातून आलेली आहे. कधी कधी आयुष्यभर हा गोंधळ सुरूच राहतो. 

परिस्थिती आपण कशी घेतो ? 


आपलेच शरीर असते, आपलेच मन असते, आपलीच बुध्दी असते. परिस्थिती अनेकांना जवळजवळ सारखीच मिळते. पण येणारा वा आलेला प्रसंग कोणी कसा घेतो , कोणाचे शरीर केव्हा काय मागणी करते, कोणाचे मन कसे, कुठे भरकटते आणि कोणाची बुध्दी किती फिरते यावर बरेच काही अवलंबून आहे. विनाशकाले विपरित बुद्धी ही म्हण इथे लक्षात घेतल्यास हे समजणे सोपे होईल.  यातूनच बऱ्याचशा घटना घडतात. या शरीर, मन व बुध्दी निर्मित घटना आहेत. त्या कोणी तरी तिसराच घडवतो असे तरी कसे म्हणावे ? हे म्हणजे आपल्या कृत्यांसाठी दुसऱ्याला जबाबदार धरण्यासारखे आहे. आपल्यावर येणारा दोष साळसूदपणे दुसऱ्यावर  ढकलण्यासारखे आहे. मानवाच्या क्षमतेपलिकडे असलेल्या गोष्टी तिसऱ्याच शक्तीने घडवणे हे एक वेळ समजण्यासारखे आहे.‌  

प्रसंग आपण जन्माला येतानाच मागून घेऊन तर येत नाही ना ?


मूळात, तुमच्या माझ्या जीवनात घटना घडतात कुठून ? मला वाटते आपण जन्माला येतानाच ते पॅकेज सोबत घेऊन येत असण्याची शक्यता आहे. प्रत्येक जण आपले नशिब घेऊन येतो म्हणतात , ते हेच घटनांचे पॅकेज असावे. हातावरच्या रेषा व शिरा, धमन्या यांमध्ये आपल्या आयुष्यात पुढे कोणकोणते प्रसंग वा घटना येणार आहेत, ते अंतर्भूत असावेत असे वाटते. केवळ घटनाच नाहीत तर त्यातील माणसे, प्रदेश, प्रवास इ. सारे सारे आपण सोबतच घेऊन येतो की काय ही शंका आहे. कारण आपले नशिब वा जीवन याच अवतीभवतीच्या जगाशी जोडलेले असते.‌ आपल्या संपर्कात ठराविक वेळेला ठराविकच माणसे कशी येतात ? कधी कधी तर नेमकी नको असलेली माणसेच कशी समोर येतात ? हीच माणसे आपल्या अवतीभवती का असतात ? ही आपण जन्माला येतानाच मागून आणलेली तर नसतात ना ? आपण एखाद्याला किंवा एखादीला एकट्यानेच  भेटायला म्हणून त्याच्या / तिच्या घरी जातो तर तिथे आधीच कोणी तरी कडमडलेले असते ! आपण गेल्या पावली परत फिरतो !  हे प्रसंग आपण जन्माला येतानाच मागून घेऊन तर येत नाही ना ? असे वाटण्याचीच ही वेळ असते ! 

पूर्व कर्म म्हणतात ते हेच असावं का ? 


बऱ्याचदा आपण अशा प्रसंगांना सुरूवात करतो. ही आपले शरीर , मन व बुध्दीची इच्छा असते. थोडक्यात , हे आपलेच कर्म असते. आपण सुरूवात केली तर सृष्टीचक्रात पुढच्या घडामोडी  घडू लागतात. आपण घराबाहेर पहिलं पाऊल टाकतो , आपला प्रवास सुरू होतो. हे कोण करतं ? आपणच ना ? त्यानंतर पुढच्या घटना घडायला सुरूवात होते. कधी कधी तर हे पूर्वनियोजित असल्याप्रमाणे वाटते. हे जन्माला येण्यापूर्वी किंवा येताना आपणच तर सुनिश्चित केलं नाही ना ? पूर्व कर्म म्हणतात ते हेच असावं का ? 

आपल्या मूळ समस्येची उकल होण्याची  सुरूवात ?


मला वाटते जो सेट अप आहे तो थोडासा आपल्याला कळत आहे. कदाचित , आपल्या मूळ समस्येची उकल होण्याची  ती सुरूवातही असू शकते. हा विषय उगाचच गहन बनत चालला आहे का ? असे तुम्हांला वाटत असेल तर आपण तूर्त इथेच थांबू. पुढील लेखात आपण त्यादृष्टीने विचारमंथन सुरू ठेऊ. 

#mind
#brain
#body

Comments

Popular posts from this blog

समस्यांचे प्रकार

मन, बुद्धी, आणि शरीर यांचा संबंध कोणाशी आहे ?

व्हिडीओंमधून सामाजिक समस्या

ऑफलाईन व ऑनलाईन समस्या

समस्यांचे स्वागत