मन, बुद्धी, आणि शरीर यांचा संबंध कोणाशी आहे ?

आपल्या सर्व समस्या ह्या आपले मन, बुध्दी व शरीर यांच्या व्यवहारातून निर्माण होतात. त्या सोडवायच्या तर मूळ समस्येचाच विचार करायला हवा. आपली मूळ समस्या मन, बुध्दी व शरीर आणि ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन शक्ती यांचा काही संबंध आहे का व असल्यास तो कोणता आहे हीच आहे ! म्हणूनच समस्या या ब्लॉगवर ही समस्या विचारात घेतली आहे. 

मन, बुध्दी व शरीर यांचा ब्रम्हा, विष्णू व महेश यांच्याशी काही संबंध आहे का ? 

गेली काही वर्षे मनात एक प्रश्न‌ घोळत आहे. मानवी जीवनाचे अनेक गुंते त्याच्याशी निगडीत आहेत. अनेक समस्यांचे मूळ तिथेच आहे. जगात अनेक ठिकाणी मानवी जीवन हे देवादिकांशी जास्त जोडले गेले आहे.‌ काही धर्म रीतीरिवाजात अशा शक्तींना मानले जाते. विशेषत:, हिंदू धर्मात ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन शक्ती निर्मिती, पालनपोषण, नाश व नाशातून पुन्हा निर्मिती यांच्याशी संबंधित आहेत , असे मानले जाते. या तीन शक्तींमार्फत हे सृष्टीचक्र अशाप्रकारे अव्याहतपणे सुरू ठेवण्यात आले आहे, अशी धारणा दिसून येते. या देवतांची निर्मिती मात्र नक्की कशी झाली हा गूढ प्रश्न आहे. जीवनात जे गूढ प्रश्नं आपल्या सर्वांना पडतात, त्या सर्वांच्या मूळाशी हाच प्रश्न आहे. त्याही मागे जायचे झाले तर विश्वाची निर्मितीच मूळात कशी झाली हा मूळारंभी गूढ प्रश्नं आजही सुटलेला दिसत नाही. 

मानवी जीवनात एवढ्या समस्या का आहेत ? 

मानवी जीवन हे समस्यांनी भरलेले आहे. मूळात, मानव सतत प्रगती करू इच्छितो.‌ पुढे जातांना काही समस्या तर उद्भवणारच. तुम्हांला असेच कोण पुढे जाऊ देणार आहे ? सगळे सहज मिळत गेले तर तुम्ही आळशी होणार आणि तुमची प्रगतीच ठप्प होणार. यासाठीच अडचणी, समस्या पेरलेल्या आहेत. जीवनात तुम्ही सतत काही तरी करीत राहणे अभिप्रेत आहे. सतत पुढे जात राहणे म्हणजेच जीवन चालणे किंवा चालविणे होय. एका अर्थाने, आपणच आपले जीवन चालवत असतो. पेलले नाही की देवांचा आधार घेतो. आपण जन्मतो. हालचाल करू लागतो. उपडी वळतो. कोपराढोपरावर पुढे सरकतो. बसू लागतो. भिंतीला धरून वा कुणाचे तरी बोट पकडून उभे राहतो. चालू लागतो. दुडूदुडू धावू लागतो आणि पुढे जीवनातही स्वतःच्या पायांनी धावत राहतो. आपल्याला जमो न जमो, आवडो न आवडो, जीवनातले अनेक निर्णय आपले आपल्यालाच घ्यावे लागतात.  हे असे आपले जीवन आपणच चालवत असतो ; नाही तर काय ? 

ब्रम्हा, विष्णू, महेश


मन, बुध्दी व शरीर यांच्यामध्ये ब्रम्हा, विष्णू , महेश यांचा निवास असावा का ? 

पण अडचण आली की आपण मदत घेतो. इतर माणसे , महात्म्ये, परमेश्वर ही आपली मदत केंद्रे असतात. ज्यात ब्रम्हा, विष्णू , महेश या त्रिदेवताही असतात. देवता ह्या शक्ती निदर्शक आहेत. शक्तींचे स्त्रोत आहेत. असे म्हटले जाते की देवतांचा निवास सर्व चराचरात असतो.‌ याचा अर्थ असाही होतो की, मानवी मन, बुध्दी व शरीर हा या चराचराचाच भाग असल्याने त्यांमध्येही या देवतांचे अस्तित्व असले पाहिजे.‌ थोडक्यात, मन, बुध्दी व शरीर यांच्यामध्ये ब्रम्हा, विष्णू , महेश यांचा निवास असावा.‌ एक तर या तीन देवता ह्या तीन गोष्टी नियंत्रित करीत असाव्यात किंवा किमान तसा प्रतिकात्मक संबंध तरी लावता येईल, असे मानण्यास वाव आहे.‌

हिंदू देवदेवता


ब्रम्हा निर्मितीशी व निर्मिती ही बऱ्याच अंशी बुध्दीशी संबंधित असल्याने , ब्रम्हा म्हणजे बुध्दी समजावे का हा प्रश्न आहे.‌

विष्णू पालनकर्ता आहे. पालन हे संवेदनशील मनाने करावयाचे असल्याने तो संवेदनशील मनाचा कारक आहे.  मन हे संवेदनशीलतेप्रमाणे भावनेचे प्रतीक आहे.  मग विष्णू म्हणजे मन समजावे का हा प्रश्न आहे.‌

तिसरी देवता आहे महेश.‌ ही देवता दोन कार्ये करते असे मानले जाते. शरीराचा मृत्यू व पुनर्निर्मिती. संहारातून नवे प्रजनन करणे हे सोपे काम नाही. म्हणूनच कदाचित महेशाला देवांचाही देव महादेव म्हटले जात असावे. शिव हे त्याचेच आणखी एक नांव शरीर या शब्दाशी कुठेतरी जवळीक दाखवणारे आहे . शिव म्हणजेच शरीर असावे का ?



तुम्हांला काय वाटते ? 

वरील तीन देवता व मानव यांचा असा खरोखरच काही संबंध आहे का ? म्हटली व मानली तर ही एक समस्या आहे.‌ ही समस्या कशी उलगडायची ? केवळ हे असे आहे अशी मनाची समजूत करून घ्यायची की यामागची सत्यासत्यता शोधायची ? काय करावे असे तुम्हांला वाटते ? 




Comments

Popular posts from this blog

समस्यांचे प्रकार

व्हिडीओंमधून सामाजिक समस्या

ऑफलाईन व ऑनलाईन समस्या

समस्यांचे स्वागत

मन, बुध्दी व शरीर यांबाबत थोडेसे अधिक बोलू